Wednesday, 31 October 2018

भयकथा: तुला पाहते रे, तुला पाहते!

मनोजला इंजिनियरींगच्या पहिल्या वर्षी हॉस्टेलमध्ये राहिल्यानंतर स्वतंत्र रूम घ्यावीशी वाटली.

दोन मित्रांसह तो रूममध्ये राहू लागला. किचन आणि मोठा हॉल अशा रचनेच्या घरात ते तिघेजण रहात होते. भाडे तिघांमध्ये विभागले जात असल्याने परवडत होते आणि ही रूम त्या एरियातल्या इतर रूम्सपेक्षा खूप स्वस्तात मिळाली होती. तिघांनी रुममध्ये टिव्ही मुद्दाम ठरवून घेतला नव्हता, त्याऐवजी एक स्वस्त वाय फाय घेतले होते. पैसा आणि वेळेची बचत हे हेतू त्यामागे होते.

मनोजचे आईवडील गावी होते. अधून मधून त्याला भेटायला येत. पहिल्या वर्षी 60 टक्के मार्क मिळाले होते म्हणून आईवडिलांनी चांगला नवीन स्मार्टफोन घेऊन दिला होता. एका रात्री जवळच्याच एका नेहमीच्या मेसमध्ये जेवण करून आल्यानंतर तो रूममध्ये आला. परवाच दोन्ही रूम-मेट्स राजेश आणि अविनाश त्यांच्या गावी काही तातडीच्या कामासाठी गेले होते आणि उद्या सकाळी ते परत येणार होते. दोघेही एकाच गावचे होते. रात्री स्लीपर कोच ट्रॅव्हल्समध्ये बसल्याचा त्या दोघांनी मनोजला कॉल केला होता. मग जेवण केल्यावर त्या दोघांना गाढ झोप लागली....

मनोजचा आजचा सगळा अभ्यास झाला होता आणि जर्नल सुध्दा लिहून झाले होते.

थोडा वेळ त्याने मित्रांच्या व्हॉटस्ऍप ग्रुपवर रिकाम्या गप्पा मारल्या मग मोबाईलवर इयरफोन लावून गाणी ऐकली. आता त्याला झोप येऊ लागली...

झोपण्याआधी रूमचा दरवाजा नीट लॉक करून समोरच्या पुस्तकांच्या कपाटात वह्या पुस्तके आपल्या जागेवर ठेऊन त्याने ते कपाट बंद केले. मग त्याची सहज नजर गेली तिकडे उजव्या बाजूला थोडे दूर एक बूट ठेवण्याचे लाकडी स्टँड (शूज रॅक) होते त्यावर बूट आणि चपला ठेवलेल्या होत्या.

सगळ्यात वर त्याचे स्पोर्ट शूज, त्याखाली चपला आणि त्याखाली फॉर्मल शूज होते. आणखी खालचे दोन रॅक रिकामे होते. तेथे त्याचे दोन्ही रूममेट्स बूट चपला ठेवत.
डाव्या बाजूला टेबलावर अभ्यास करण्यासाठी टेबल लॅम्प होता, तो त्याने बंद केला आणि स्विचबोर्डकडे थोडा हात लांबवून रूम मधला मेन लाईट बंद करून मग उंचावर असलेला पिवळा डिम लाईट त्याने ऑन केला.

सीलिंग फॅन सुरूच होता... घर्र घर्र घर्र  ....

समोरच्या भिंतीवर कॅलेंडर टांगलेले होते. त्यावर वेगवेगळी चित्रं छापलेली होती. पिवळ्या डीम लाईटच्या प्रकाशात ती वेगळीच वाटत होती. त्यांच्यातील मूळचे रंग बदलून ते वेगळेच भासत होते.

कॅलेंडरच्यावर भिंतीवर एक घड्याळ टांगलेले होते...
तो बेडवर आला आणि झोपणार इतक्यात अचानक आठवण आल्याने उठून त्याने फ्रीजमधून पाण्याची बाटली घेतली आणि टेबल लॅम्पजवळ टेबलावर ठेवली. त्यानंतर जवळच्याच खिडकीची जाळी सरकवली, पडदा सरकवला आणि बेडवर आला आणि पांघरूण घेऊन तो झोपून गेला...

****

ती सँडलची जोडी कुणाची आहे?
लेडीजची दिसते आहे, ते ठीक आहे हो, पण माझ्या शूजच्या खाली कशी आली ती जोडी?
कमाल आहे?
मला कुणी भेटायला आलं होतं का?
नाही, माझ्या दोन पाच मैत्रिणी आहेत पण त्या कधी रूमवर भेटायला येणार नाहीत काही!
आणि मी त्यांना रूमवर भेटायला बोलवण्याइतका माझ्यात दमही नाही...

आणि हे काय? टेबलावर हे काय? काहीतरीच!
टिकल्या, बांगड्या? लिपस्टिक?
कुणी ठेवलं हे इथं?
आणि हा मंद सुगंध कसला येतोय?
असे परफ्यूम मी अजूनपर्यंत तरी वापरल्याचे आठवत नाही!

इतक्यात त्याचं लक्ष कॅलेंडरकडे गेलं. बापरे!!
त्या कॅलेंडरच्या खिळ्याला काय टांगलंय ते? सापासारखं वाटतं आहे!

ते काही नाही, मला बघितलं पाहिजे काय आहे ते नेमकं??
आता टॉर्च पेटवतो आणि मारतो फोकस तिकडे...

त्याने टेबलच्या ड्रावरमधून टॉर्च काढला आणि तो ऑन करून कॅलेंडरवर फोकस मारला...
कॅलेंडरच्या खिळ्याला एक वेणी टांगलेली होती.

मोठ्ठी होती.. काळीशार!

घाबरून तो ओरडला आणि झोपेतून घामेघूम होऊन जागा झाला आणि भेदरल्यासारखा इकडे तिकडे बघू लागला...
त्याला अभद्र स्वप्न पडलं होतं..
बाजूच्या बाटली मधलं पाणी पिऊन तो थोडा शांत झाला..

बाजूच्या टेबलावर काही नव्हते, शू-रॅकवर लेडीज चपलांचा जोड नव्हता, कॅलेंडरवर सुध्दा काहीही टांगलेले नव्हते पण फॅनच्या हवेने ते फडफडत होते.
एरवी नाही पण आज त्या स्वप्नामुळे त्याला नेहमीच्या सवयीचा कॅलेंडरच्या फडफडण्याचा आवाज सुध्दा कोण भीतीदायक वाटत होता!!

त्याने पटकन लाईट लावला आणि कॅलेंडरला यु-क्लिप अडकवली.
घड्याळात रात्रीचे दोन वाजले होते.

पण का कोण जाणे तो मंद सुगंध अजूनही त्याच्या नाकात ठाण मांडून बसला होता...

****

टडींग टिंग...

मोबाईल मध्ये मेसेज ट्यून वाजली. ओहो, झोपताना तो घरातले आणि मोबाईलमधले वाय फाय बंद करायचे विसरला होता...

"बघू कुणाचा मेसेज?" म्हणून त्याने मोबाईल उचलला कारण आता नाहीतरी झोप उडालेली होती.

त्याने झोपण्यापूर्वी व्हॉट्सऍपच्या आधी एक "अन्नोन चॅट" (अनोळखी गप्पा) हे ऍप नुकतेच डाऊनलोड केले होते पण ते बंद करायचे तो विसरला होता.

त्यातच कुणाचा तरी मेसेज आला होता.

मुलगी होती ती!

"एकटीच_मी" या टोपण नावाने चॅट करत होती. तिनें "हाय" केलं. याने "तुझाच_मी" हे टोपण नाव टाकले आणि "हॅलो" केलं.

एकटीच_मी: "झोप येत नाही. मी एकटीच आहे मारतोस का गप्पा माझ्याशी?" 🤔🤗👱

तुझाच_मी: "नक्की मारूया की गप्पा! पण तु मुलगी आहेस ना? आणि आता एकटी आहेस ना? कारण बहुतेक वेळेस अशा अनोळखी गप्पांमध्ये मुलींचे नाव टाकून मुलंच गप्पा मारतात आणि गंमत करतात" 😏

एकटीच_मी: "मी मुलगीच आहे! आणि आता एकटीच आहे. आणि तसं पाहिलं तर प्रत्येक जण या जगात एकटाच असतो रे....ते जाऊ दे! 😶 मी मुलगी आहे हे तुला पटल्याशिवाय तू काही पुढे गप्पा मारणार नाहीस. तर मला सांग मी मुलगी आहे हे सिद्ध करण्यासाठी मी नेमकं काय करू?" 🤔

तुझाच_मी: "सरळ सरळ व्हिडिओ चॅट कर म्हणजे प्रश्नच नाही येणार" 😋

एकटीच_मी: "वाहरे! अगदी सुरुवातीलाच एकदम व्हिडिओ चॅट करायला सांगतोस? थोडी एकमेकांची ओळख तर होऊ देत! मी असे करते, तुला माझा एक छान फोटो पाठवते. विश्वास ठेव माझ्यावर, मी मुलगीच आहे!" 👸

लगेच समोर एक फोटो आला, त्या फोटो मधली मुलगी अतिशय सुंदर दिसत होती. दिवसा काढलेला तो एक सेल्फी होता आणि तिने अतिशय आकर्षक कपडे घातले होते. तिचे लांब केस तिने मोकळे सोडलेले होते, चेहऱ्यावर स्मितहास्य होते आणि खोल गळ्याच्या तंग टीशर्ट मधून तिच्या छातीवरचे उभार बरेचसे दिसून येत होते.

एकटीच_मी: "बघा बघा कसा चेहरा उजळला एका मुलाचा आणि चेहऱ्यावरचे रंग कसे उडाले! आणि कशी धडधड वाढली माझा फोटो पाहून! एकदम "घायल पार्ट 3". अगदी इथपर्यंत ऐकू आली मला तुझे हृदयाचे वाढलेले ठोके! धक धक.. धक धक.."😊

तुझाच_मी: "तुला कसं कळलं गं?" 🤔

एकटीच_मी: "अरे गम्मत केली, सगळ्या मुलांची हीच हालत होते मला पहिल्यांदा या फोटोत बघतात तेव्हा!"

तुझाच_मी: "असं का? सगळ्या मुलांची? म्हणजे आणखी किती बॉयफ्रेंड्स आहेत तुझे? आणि स्वतःच्या सौंदर्याचा एवढा अभिमान बरा नाही! बरं, जाऊ दे! सुंदर मुलींना असं सांगणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी!! बरं एक सांग, आता तू काय करते आहेस? म्हणजे एकटी आहेस हे नावावरून वाटतंय पण नेमकी तू कुठे आहेस? कोणत्या शहरात राहतेस? खरंच तू एकटी आहेस का?"

एकटीच_मी: "अरे हो हो. किती वेळा सांगू की मी खरंच एकटी आहे आणि अजून आपली पुरती ओळखही नाही आणि मला माझ्या बॉयफ्रेंड्स बद्दल विचारायला सुरुवात? इतका पझेसिव्ह? आतापासूनच? मी विचारलं का तुला तुझ्या गर्लफ्रेंड्स किती म्हणून? आणि बरं का, जसा तू आता एकटा बसला आहेस ना, बेडवर पांघरूण घेऊन आणि लोडला टेकून लांब पाय करून, तशीच मी पण मऊ चादर पांघरून लोळले आहे माझ्या मऊ मऊ बेडवर...पण चादरीच्या आतमध्ये मात्र....!!!"😉

मनोजच्या अंगातून वेगाने एक भीतीची जोरदार लहर पायापासून मस्तकापर्यंत गेली.

हिला कळलं तरी कसं?
हिला मी दिसतोय की काय आणि कसा?
दोन क्षण त्याला काही सुचलेच नाही आणि मोबाईल हातातून बेडवर गळून पडला...

मग त्याने पांघरूण झटकले आणि खिडकीचा पडदा बाजूला करून बघितला, जणू ती मुलगी खिडकीतून त्यांचेकडे बघते आहे, पण खिडकी बाहेर कुणी नव्हतं.

एक कुत्रा मात्र समोरच्या निर्जन रस्त्यावर एका विजेच्या खांबाखली बसून करुण आवाज काढून विव्हळत होता आणि मनोजने पडदा बाजूला करून समोर बघताच तो कुत्रा मनोजकडे बघून रडायला लागला. ते पाहून त्याने पटकन पडदा बंद केला आणि मेन लाईट स्वीच ऑफ केला. त्याला भीती वाटली की आणखी कुणी उजेडामुळे आपल्याला बघत तर नाही ना!!!

****

टडींग टिंग...
टडींग टिंग...
टडींग टिंग...
टडींग टिंग...

"बापरे एकसारखे किती मेसेज पाठवते ही पोरगी?" असे म्हणून त्याने पुन्हा पूर्वीच्या स्थितीत बसून मेसेज बघायला सुरुवात केली. चार मेसेज एकदम आलेले होते.

एकटीच_मी: "अरे? घाबरलास की काय?"🤔

एकटीच_मी: "कुठे गेलास?"

एकटीच_मी: "अरे, मी गंमत केली" 😀

एकटीच_मी: "अरे ऐक तर खरं पुढे! मी बेडवर मऊ चादरीखाली कशी आहे ते ऐकायचं नाही का? तुला ते सांगायच्या आतच किती घाबरा झालास, उठून इकडे तिकडे काय गेलास, खिडकी काय उघडून बघितलीस आणि कुत्र्याला बघून भीतीने चांगला पांढराफटक पडला होतास की...घाबरट कुठचा!"

पुन्हा त्याला तो प्रश्न पडला की हा काय प्रकार आहे?
ही अचूकपणे कसे सांगते की मी खोलीत काय करतोय?
ह्या चॅटिंग अँप मध्ये पलीकडच्या व्यक्तीचा कॅमेरा स्विच ऑन करता येतो की काय?
पण त्याच्या फ्रंट कॅमेराला ऑन केल्यास फ्लॅशपण ऑन होत असे त्यामुळे आता फ्लॅश चालू नसल्याने ती शक्यता नव्हती...

पण आता त्या प्रकारची भीती वाटण्यापेक्षा त्याला "ती" मऊ पांघरुणाच्या आत कशी बसली आहे (बहुदा काहीच कपडे न घालता?) हे तिच्याच शब्दांत ऐकण्याची म्हणजे वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्याच्यावरचा भीतीचा अंमल थोडा दूर होऊन आता तिच्या (अजून पूर्ण नीट न पाहिलेल्या) सौंदर्याचा अंमल त्याचेवर हळूहळू वाढायला लागला.

तुझाच_मी: "बरं सांग, कशी बसली आहेस तू मऊ चादरीखाली?"😁🤔😚

एव्हाना त्याच्या शूज रॅकवरून दोन लेडीज सँडल्स, आवाज न करता उतरल्या आणि त्याच्या बेडकडे हळूहळू चालत यायला लागल्या. लाईट बंद असल्याने आणि चॅटिंग मध्ये संपूर्ण गुंतल्याने त्याचे तिकडे लक्ष गेले नाही. एव्हाना टेबलावर टिकल्या, बांगड्या आणि लिपस्टिक वगैरे सुद्धा दिसायला लागले होते.

दरम्यान खिडकीच्या पडद्यावर एक सावली दिसायला लागली होती. कुणीतरी खिडकीच्या गजाला दोन्ही हातांनी धरून एकसारखं आतमध्ये बघत आहे असं वाटत होतं पण त्या बघणाऱ्याचा चेहरा मानवी वाटत नव्हता. थोडासा कुत्र्यासारखा भासत होता. बहुदा तो त्या खांबाखाली बसलेला मघाचा कुत्रा असावा काय?

कॅलेंडरच्या खिळ्याला आता केसांचा झुपका आकार घेत होता. मोकळे सोडलेले केस होते ते! हळूहळू त्यात नवनवीन केसांची भर पडू लागली आणि वेणी बनायला सुरुवात झाली.

पण मनोजचे तिकडे लक्ष नव्हते. जणू काही मोबाईलच्या स्क्रीनशी त्याचे डोळे एखाद्या जहरी संमोहन प्रभावाने बांधले गेले होते!

एकटीच_मी: "अरे, बरं मला एक सांग आता! मी मऊ चादरीखाली कशी बसले आहे हे तुला शब्दांनी अनुभवायचे आहे की शरीराने?"😃

तुझाच_मी: "बापरे, म्हणजे?"🤔

एकटीच_मी: "तू म्हणशील तर येते मी? येऊ का?"

एव्हाना लेडीज सँडल्स त्याच्याजवळ बेडच्या जवळ अशा काही येऊन स्थिरावल्या जणू काही त्या कुणी पायात घातल्या आहेत आणि पायात घालणारी ती बेडवर बसली आहे, पण सध्या तिथे दिसत होत्या फक्त सँडल्स....

तुझाच_मी: "येते मी? म्हणजे?" 🙄

एकटीच_मी: "अरे, घाबरू नकोस रे असा! सांगते थांब. तुझ्या जवळ एखादी कापडी पट्टी आहे का? ती डोळ्यांना करकचून बांध आणि परत बेडवर येऊन बैस. आणि हो, मला फसवलंस आणि पट्टी काढलीस तर माझ्याशी गाठ आहे, आजच्या या रात्री! लक्षात ठेव, मी तुला पाहते आहे!"

भीती तसेच तिला बघण्याची (अनुभवण्याची) उत्सुकता आणि त्याच्यावर पडलेला कसलातरी अघोरी प्रभाव यामुळे त्याने मोबाईलवर "बरं, थांब पट्टी शोधतो", असे टाईप केले आणि कापडी पट्टी शोधायला तो भारावल्यासारखा उठला.

तोपर्यंत मोबाईलमध्ये तिचे काही मेसेज येतच राहिले.

एकटीच_मी: "अरे बिचारा, हासुद्धा इतर मुलांसारखाच निघाला. लगेच याला माझे शरीर बघायचे आहे. आतापर्यंत माझा शरीर विरहित आत्मा वर्षभर खिन्नता आणि विषाद यात तळमळत होता. आता मी पुन्हा जागी झाले आहे आणि सगळ्या पुरुषजातीचा बदला घेणार आहे. मला मुक्ती नकोय! मला भूतयोनीतच राहून बदला घ्यायचाय" 😰

एकटीच_मी: (पुढे टाईप करू लागली)

"मागच्या वर्षी याच दिवशी याच खोलीत काही पुरुषांनी माझा घात केला! पुरुषांनी म्हणजे माझे चांगले ओळखीचे होते ते! मित्र होते नावाला नुसते! त्यांना मित्र म्हणायला लाज वाटते मला.
शेवटी काय सगळे पुरुष सारखेच! स्त्री दिसली आणि थोडी मैत्री झाली की यांना लगेचच तिच्याशी सेक्स करायचा असतो.
फक्त त्याच उद्देशाने मैत्री करतात सगळे पुरुष. काहींना संधी मिळत नाही म्हणून ते काही करत नाहीत आणि काहींना मिळाली रे मिळाली की ते डायरेक्ट... शी!...
मला सांगायला सुद्धा लाज वाटते.
शहरात शिक्षण किंवा नोकरी निमित्ताने एकट्या राहणाऱ्या स्त्रीने म्हणून काय कुणाच पुरुषाशी मैत्री करूच नये काय?
माझ्यावर अत्याचार करणारे तर पैशांचे वजन वापरून काही महिन्यांनी सुटले.
माझा न्याय संस्थेवर विश्वास होता म्हणून मी भरकटलेल्या आत्म्याच्या रूपाने निकाल लागेपर्यंत थांबले होते पण ते सगळे "निर्दोष" सुटले...
मात्र त्याच रात्री दारू पिऊन तो आनंद साजरा करतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांचा चेंदामेंदा झाला.
माझा काहीही हात नाही बरं का त्यांच्या गाडीला अपघात करण्यात...
निर्दोष सुटले म्हणून त्यांचा राग आल्याने मी फक्त त्यांना जाब विचारायला म्हणून त्यांच्या गाडीसमोर येऊन उभे राहिले होते...बाही काही नाही...
उगाच माझ्यावर नाव घेऊ नका हं तुम्ही कुणी!! हां, माझा चेहरा बघून ड्रायव्हरसहित गाडीत बसलेले ते सगळे असे भयंकर दचकले होते ना, की सांगता सोय नाही! आणि मग ..."

****
मनोजला एव्हाना एक कापडी पट्टी त्याच्या पुस्तकांच्या कपाटात सापडली. त्याने पटकन ती डोळ्यांना बांधली आणि हळूहळू चाचपडत बेडवर येऊन बसला.

आता पूर्ण खोलीभर एक छान सुगंध पसरला आणि एसी लावल्यासारखी खोली थंड झाली. कुठे असेल ती, खरंच येईल का असा विचार करत बेडवर तो हात चाचपडत होता. कुणीतरी जवळ बसलंय अशी जाणीव त्याला होऊ लागली. त्याची उत्सुकता ताणली गेली...

मोबाईलमध्ये अक्षरे टाईप होतच होती...

एकटीच_मी:

"खरे तर ते दोघे मेले त्याच वेळेस मला मुक्ती मिळायला हवी होती. पण मला आकाशातून हजारो काळ्या अघोरी आकृत्या "नको जाऊस" म्हणून विनंती करत होत्या.
मी त्यांचं ऐकलं...
ऐकू नाही तर काय करू?
मला आवाहन करतांना त्यांच्या नजरेची जरब काय साधी होती का?
एका झटक्यात मी ठरवलं, यांचं ऐकायचंच!
ते म्हणतील तेच ऐकायचं!
मग त्यांनी मला माझ्या कानात आमच्या काळ्या गूढ जगाचं एक रहस्य सांगितलं ते म्हणजे, दरवर्षी याच दिवशी याच वेळेस जर का मी या खोलीत आले आणि तोच अत्याचार आठवून पुन्हा मनात अनुभवला तर मला एक अमानवी शक्ती प्राप्त होणार आणि मनोज सारख्यांची नियत पडताळून मला त्यांना तसेच दुःख आणि पीडा देता येईल, आणि पुरुषजातीचा बदला घेता येईल!
एक बळी गेला की ही आनंदाची बातमी त्या काळ्या अघोरी आकृत्यांना मी सांगणार आणि मग मला त्या आणखी नवीन रहस्य सांगणार, आणखी नवीन काळी शक्ती कशी मिळवता येईल याबद्दल!! मी घेतलेले बळी वाढतील तशी माझी शक्तीसुद्धा वाढेल!"

****

बेडवर बसलेल्या मनोजला मागच्या बाजूने अचानक संपूर्ण नग्न अश्या भरगच्च शरीरयष्टीचा स्त्रीचा स्पर्श जाणवला.

मागच्या बाजूने तिचे दोन्ही उभार त्याला पाठीवर गच्च दाबले गेलेले जाणवले...
प्रथमच असा कुणा स्त्रीचा स्पर्श त्याला होत होता...
त्याच्या शरीरभर रोमांच आणि त्याच्या पौरुषात सळसळतं चैतन्य संचारलं...

पण अशा प्रणय प्रसंगात शरीरात जी हवीहवीशी गरमी निर्माण होते ती मात्र तिच्या शरीरात जाणवत नव्हती.
त्याऐवजी जाणवत होते एक बर्फासारखं थंडगार शरीर!! आणि त्यामुळे तो एवढ्या थंडीत घामेघुम झाला....

तरीही त्याच्या मनात एकदा तरी पट्टी काढून तिला बघावे अशी अनावर इच्छा होत होती आणि त्याने तसा प्रयत्न सुद्धा केला पण ती पट्टी त्याच्या डोळ्यातून निघेचना!
जणू काही त्याच्याच शरीराच्या मांसाची एखादी पट्टी टाके घालून त्याच्याच डोळ्यांभोवती बांधली आहे, असे त्याला जाणवत होते...

मग मागच्या बाजूने त्याच्या मानेला तिने तिचे नाक आणि ओठ घासायला सुरुवात केली आणि तिने त्याला दोन्ही हातांनी छातीवर करकचून पकडले...
जिथे जिथे तिच्या शरीराचा स्पर्श झाला तिथे तिथे त्याला असंख्य काळे विंचू चावत असल्यासारखी वेदना झाली. अंगभर सुया टोचल्यासारखे वाटत होते.

खिडकीतली ती आकृती पडद्याआडून एकटक या सगळ्या प्रकाराकडे बघत होती...

त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला पण तिने तिच्या उजव्या हाताची दोन्ही बोटं त्याच्या ओठांवरून फिरवलीे आणि त्याचे ओठ टाके घालून शिवल्यासारखे बंद झाले...

कलेंडरवरच्या खिळ्याला असलेल्या केसांची वेणी आपोआप बांधून पूर्ण झाली आणि ती वेणी तेथून निघून मनोजच्या गळ्याभोवती करकचून बांधली गेली.
आणि ती गाणे म्हणू लागली, "तुला पाहते रे, तुला पाहते, जरी आंधळा तू, तुला पाहते मी!"

आता चारही भिंतीवर अनेक काळ्या सरपटणाऱ्या आकृत्या जमा झाल्या होत्या आणि बेडवर जे काही चाललं होतं त्याकडे कुतूहलाने बघत होत्या...

****

घनघोर अंधारात, निर्जन आणि थोड्याश्या कच्च्या रस्त्यावरून जातांना ती स्लीपर कोच ट्रॅव्हल्स बस खूपच डगमगली.
हा कच्चा खड्डेरी रस्ता आता बराच वेळ असणार होता. मग नंतर मोठा घाट लागणार होता...

ड्रायव्हर निर्विकारपणे गाडी चालवत होता.

बसच्या मागच्या बाजूला समोरासमोर वरच्या बाजूला सॅक डोक्याखाली घेऊन झोपलेल्या अविनाश आणि राजेशच्या सॅक मधून एकाच वेळेस मोबाईलच्या व्हायब्रेशनची घुर्र घुर्र घुर्र झाली आणि अधून मधून चमकणारा फ्लॅश लाईट जाणवू लागला. अविनाशची खड्डेरी रस्त्यामुळे अर्धवट झोपमोड झालीच होती आणि तेवढ्यात डोक्याखाली व्हायब्रेशन जाणवलं तसा तो उठून बसला आणि त्याने चेन उघडून मोबाईल बाहेर काढला आणि डोळे चोळून पाहिले तर "मनोज कॉलिंग" अशी अक्षरे दिसायला लागली.

त्याने टच स्क्रीनवरून स्वाईप करून कॉल रिसिव्ह करण्याचा प्रयत्न केला पण कॉल रिसिव्ह होत नव्हता.

फोन एकसारखा व्हायब्रेट होत होता, थांबतच नव्हता.

मग त्याने राजेशला हाक मारून जागवले तेव्हा त्याला दिसले की राजेशच्या डोक्याखालच्या सॅक मधून सुद्धा मोबाईल व्हायब्रेट होत होता आणि सॅक मधून प्रकाश चमकत होता....

राजेशने चेन उघडून मोबाईल काढला आणि पाहिले की स्क्रीनवर "मनोज कॉलिंग" लिहिले होते आणि त्याने कॉल रिसिव्ह करण्याचा प्रयत्न केला तर कॉल रिसिव्ह होत नव्हता. फोन एकसारखा व्हायब्रेट होत होता...

दोघांना एकाच वेळेस मनोजकडून कॉल आला होता पण रिसिव्ह करता येत नव्हता आणि कॉल बंदसुद्धा होत नव्हता...व्हायब्रेशन तर आता इतके वाढले होते की अख्खी बस व्हायब्रेट होते आहे असे भास व्हायला लागले...

आणि ट्रॅव्हल्स आता अंधाऱ्या घाटाच्या नागमोडी वळणावरून चढू लागली...

(समाप्त)

- निमिष सोनार

Monday, 8 October 2018

भयकथा: त्या वळणावर..

"भेटलास का तू धर्मेंद्र साहेबांना? झालं ना तुझं काम?", जितेंद्र मला फोनवर म्हणाला.
"अरे, काम झालं. अगदी मनासारखं. हा क्लायंट मला मिळाला. कोरम साहेबांकडे माझ्याखातर शब्द टाकल्याबद्दल धन्यवाद. मी त्यांच्यासोबत चांगला बिझिनेस करून त्यांचे मन जिंकेल, चांगल्या दर्जाचे प्रॉडक्ट त्यांना देऊन तू त्यांना माझ्यासाठी दिलेला शब्द सार्थ करून दाखवेन!", मी म्हणालो.
आता रात्रीचे आठ वाजून गेले होते. हे काम सहा वाजता आटोपणार होते पण होता होता या ना त्या कारणाने उशीर झाला. मी जितेंद्रच्या शहरात म्हणजे अलकापूरला आलेलो होतो. मागे दोन्ही वेळेस येथे आलो होतो तेव्हा जितेंद्रकडेच मुक्काम केला होता आणि सकाळी माझ्या गावी गेलो होतो पण आज तो दुसऱ्या गावी गेलेला होता म्हणून आता कोणत्यातरी हॉटेलमध्ये जेवण करून माझ्या सेकंड हँड कारमध्ये बसून मी रात्रीच माझ्या गावी परतणार होतो. माझ्या व्यवसायाची ही सुरुवातच होती आणि अलकपूरचा हा क्लायंट मिळवायला जितेंद्रची मदत मोलाची ठरली होती. या क्लायंटने जर प्रॉडक्टची प्रशंसा केली तर आणखी त्याच्या ओळखीचे लोक मला क्लायंट म्हणून लाभणार होते.
जितेंद्रने मला जेवणासाठी स्टेशनजवळच्या एका हॉटेलचे नाव सुचवले आणि एक सावधगिरीची सूचना सुद्धा केली, "किशोर, एक तुला सांगायचंय! रात्री गाडी चालवतांना सेतूगांव फाटा पार केल्यानंतर थोड्याच वेळात घाटाचा चढाव लागतो आणि त्यावर जे पहिलं धोकादायक वळण लागतं ना, तेथे सावध राहा फक्त, बाकी काही नाही! तेथे थोडं जास्त घनदाट जंगल आहे आणि..."
"सावध म्हणजे? अँक्सिडेंट होईल म्हणून म्हणतोयस ना? नाही रे, मी गाडी रात्रीची हळूच चालवेन. काळजी करू नकोस!" मी त्याला म्हणालो.
"अरे तसे नाही, तू तर गाडी काळजीपूर्वक चालवशीलच, मला माहिती आहे, पण मी वेगळ्याच बाबतीत सावध राहा असे सांगतोय, तू विश्वास ठेव अगर नको ठेऊस पण, माझं तुला सांगणं आणि सावध करणं भाग आहे!"
"अरे जितेंद्र सांग ना, काय नेमकी भानगड आहे ती?"
"ते वळण लागलं की बाजूच्या जंगलातून हिरव्या साडीतली एक स्त्री रस्त्यावर येते आणि आपल्या गाडीसमोर येऊन उभी रहाते...सगळ्यांनाच नाही पण काही जणांना असा अनुभव आला आहे. तू फक्त एकच करायचं, गाडी थांबवायची नाही. थांबलास तर संपशील!"
मी हसायला लागलो कारण असल्या गोष्टींवर खरंतर माझा विश्वास नव्हता कारण अशा गाडीसमोर स्त्री येऊन उभ्या राहण्याच्या असंख्य गोष्टी मी कथा, कादंबऱ्या, चित्रपट आणि मालिकांमधून पहिल्या होत्या. मनोरंजन म्हणून ठीक आहे पण खऱ्या आयुष्यात असल्या गोष्टींची भीती बाळगायची म्हणजे जरा अतिशयोक्ती होते, पण तरीही त्याच्या समाधानासाठी मी म्हणालो, "हो नक्की जितेंद्र, मी योग्य ती काळजी घेईन!"
"ठीक आहे, चल बाय! हॅप्पी जर्नी आणि बेस्ट लक!"
जितेंद्रने फोन ठेवला आणि मी हॉटेलच्या रस्त्याला गाडी वळवली. हॉटेल चांगले होते. मी मलई कोफ्ता आणि तंदुरी रोटी मागवली. दोन्ही पदार्थांची चव खरोखरच सुंदर होती.
मी बिल दिले आणि गाडी स्टार्ट केली, सीट बेल्ट बांधला. साडेनऊ वाजले होते. या शहरात उगाच महागड्या लॉज किंवा हॉटेलमध्ये मुक्काम करून काही साध्य होणार नव्हते आणि तसेही उद्या मला सकाळी दहा वाजता आणखी एका सरकारी क्लायंटला भेटायचं होतं, तशी त्यांना वेळ दिलेली होती. तो क्लायंट राजकारणी लोकांशी संबंध ठेऊन होता. त्याला दिलेली उद्याची वेळ पाळणं आवश्यक होतं. मी सकाळी पाच पर्यंत गावी पोहोचणार होतो. आणि आईही गावी एकटी होती....
शहराबाहेर पडेपर्यंत साडेदहा वाजले होते, आता शहरातील नेहमीची रहदारी मागे पडून हायवेची रहदारी सुरू झाली. रस्त्यांवर वेगाने वाहणारे अवजड ट्रक जास्त संख्येने दिसायला लागले, तुरळक कार आणि टेम्पो होतेच!
जितेंद्रने सांगितलेले तो फाटा रात्री सव्वा अकरा वाजता आला. किंबहुना तो फाटा आल्यावर मला अचानक जितेंद्रने सांगितलेली त्या बाईची गोष्ट आठवायला लागली. मला मनातल्या मनात हसायला आले पण कुठेतरी मनातल्या एका कोपऱ्यात थोडीशी भीतीची लहर घर करून बसलेली दिसली...
त्या फाट्यावर मी थांबलो. थोडा चहा घेतला. मी बहुदा त्याचं शेवटचं गिऱ्हाईक होतो. माझं पिऊन झालं की तो दुकान बंद करण्याच्या तयारीत होता. दूरवर एखाद दुसरी झोपडी आणि दोन चार मिणमिणत्या पणत्या एवढेच दिसत होते, मग संपूर्ण रास्ता सुनसान होता, निर्मनुष्य होता. टपरी वाल्याला पैसे दिले आणि तो टपरी बंद करून निघून गेला. तिथला बाकड्यावर थोडा वेळ मी तसाच बसून राहिलो.
बराच वेळ तसाच बसून मी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे बघत बसलो. गाडी सतत चालवण्याने थोडासा थकवा आला होता, तो चहाने जरा दूर झाला होताच. पाचेक मिनिटांत पुन्हा गाडी सुरू करून पुढच्या प्रवासाला निघू म्हणून मी थोडं तसाच बसलो. आईला रात्रीच जेवण झाल्यानंतर मी निघतोय काळजी न करता झोप असे बजावले होते.
हायवेवर समोर दूरवरून एक लायटिंग लावलेला ट्रक मला येतांना दिसला आणि का कोण जाणे त्याच्या केबिनमध्ये असलेल्या निळ्या पिवळ्या लाल अशा म्युझिकप्रमाणे बदलणाऱ्या लाईट्सच्या प्रकाशात बसलेला ड्रायव्हर मला अतिशय बर्फासारखा आणि झोपलेल्या माणसासारखा थंड आणि काहीही हालचाल करत नसलेला असा दिसला....
त्याचे डोळे उघडे होते आणो त्याने नुसतंच स्टीयरिंग व्हील हातात धरलेलं होतं पण तो निश्चल बसून होता तरीही निर्विकारपणे ट्रक आपला पुढे जातच होता. त्याचे हात थोडेसेही हलत नव्हते. थोडं विचित्र वाटत होतं. "चला निघू, या ट्रकच्या मागोमाग जाऊ" असा विचार करून मी गाडीत बसलो आणि गाडी सुरू केली. वेगाने त्या ट्रकचा पाठलाग करून जवळ जाऊन बघूया नेमका काय प्रकार आहे ते!थोडा टाईमपाससुद्धा होईल आणि जितेंद्रने सांगितलेल्या त्या बाईची भीतीसुद्धा कमी होईल....
त्याने सांगितलेले ते वळण आता घाटातल्या चढणीवर येणारच आहे. त्या बाईने यदाकदाचित पकडलंच समजा तर आधी ती त्या ट्रक ड्रायव्हरला पकडेल. तिला पाहून घाबरल्याने कदाचित त्या ट्रक ड्रायव्हरमध्ये थोडीशी जान तरी येईल, असा विचार करत मी स्वतःशीच हसलो आणि गाडी चालवत राहिलो. मी माझ्या आवडीची गाणी लावली...
नाहीतरी व्यवसायनिमित्ताने मला कारमधून रात्री बेरात्री प्रवास करण्याचे प्रसंग येणारच होते, अशा ऐकीव भूत कथांना मी घाबरून घरीच बसून राहिलो तर काय होईल?
माझ्या कारचा वेग वाढवून मी आता त्या ट्रकचा पाठलाग करू लागलो. घाट सुरू झाला. चढ सुरू झाला. मी त्या ट्रकच्या "सुरक्षित अंतर ठेवा" पेक्षाही जवळ गेलो आणि अचानक बघतो तो काय?
तो ट्रक ड्रायव्हर अचानक त्याच्या केबिनच्या उजव्या बाजूची खिडकी उघडून तसाच पूर्वीच्याच निर्विकारपणे माझ्याकडे मागे वळून बघायला लागला. बघतच राहिला. त्याचे डोळे वाजवीपेक्षा जास्त मोठे होते! पापण्या न लवता एकसारखा माझेकडे तो बघत होता!!
"अरे बापरे, हा एकसारखा मागे पाहतोय, किती भयानक वाटतंय ते! आणि मागे बघता बघता याचा ट्रक कसा काय आपोआप पुढे चाललाय? कसे शक्य आहे? हा काय प्रकार घडतोय?"
मी असा विचार करत असतानाच त्याची मान चेहऱ्यासकट अचानक केबिन मधून खाली लटकून लोंबायला लागली. त्या लटकलेल्या मानेची नजर मात्र माझेकडे रोखून पहात होती. तो निश्चल चेहरा ट्रकच्या हेलकाव्यांबरोबरच हलत होता. डोके दाण दाण ट्रकच्या बाहेरील भागास आपटले जात होते आणि त्या चेहऱ्याच्या डोक्यातून रक्त यायला लागले होते...
ते मुंडके माझ्याकडे टक लावून बघतच होते... आपटले जात असतांनासुद्धा!!
हा भयंकर प्रकार आता मी आणखी जास्त वेळेकरता बघू शकत नव्हतो. मला हे असे बघून मळमळायला लागले आणि मी तिकडून नजर हटवली आणि उजवीकडे रस्त्याच्या बाजूला असलेल्या पर्वतावर लक्ष केंद्रित केले. पण तो त्रिकोणी पर्वत मला का कोण जाणे एखाद्या धिप्पाड राक्षसाच्या कापून जमिनीवर ठेवलेल्या मुंडक्यासारखा दिसायला लागला...
जितेंद्रने मला सांगितलेले ते वळण आता आलेले होते. वळणाप्रमाणे मी गाडी वळवली. माझ्या आधीचा तो ट्रक मात्र आता वळू न शकल्याने दरीत कोसळला.
"यापेक्षा ती हिरव्या साडीवाली बाई दिसली असती तर बरं झालं असतं, हा असला विचित्र अभद्र प्रकार तरी बघायला नसता मिळाला!", असा मी विचार करतो न करतो तोच मला माझ्या गाडीतून मागच्या सीटवरून आवाज आला, "अहो मिस्टर! ही काय मी आहे ना! केव्हापासून बसलेय तुमच्या गाडीत मागच्या सीटवर! एवढी सुंदर मुलगी मागे बसलेली असतांना तुम्ही मात्र बघत बसलाय त्या ट्रक ड्रायव्हरकडे! काय आहे एवढं त्या ट्रक ड्रायव्हरमध्ये? "
हे ऐकल्यानंतर माझ्या अंगातून जोरदार एक भीतीची लहर पसरली! चेहरा घामेघूम झाला!
मी आरश्यात पहिले...
ती खरंच होती... बसलेली!
मागे! सीटवर!
हिरव्या साडीत!
मागे वळून बघण्याची हिम्मत होत नव्हती!
पण आरश्यात ती खूपच सुंदर दिसत होती!
आरशात मी बघतच राहिलो! एकदम अलौकिक सौंदर्य! गोलसर चेहरा! काजळ घातलेले मोठे बोलके डोळे आणि फुलपाखराच्या पंखांसारख्या भासणाऱ्या पापण्या ! धारदार सुंदर नाक! गुलाबाच्या फुलांसारखे नाजूक सुंदर थोडेसे विलग झालेले हसणारे ओठ!
"क..क.. कोण आहेस तू? माझ्या गाडीत कशी आलीस?"
माझी बोबडी वळलेली बघून तिचे आरशात दिसणारे ओठ हसायला लागले.
मी गाडी चालवतच होतो. मात्र अजूनही मागे वळून बघायची माझी हिम्मत होत नव्हती.
आरशातून ती म्हणाली, "या वळणावर मला अनेक जण भेटतात किंवा असे म्हणा ना, की मी येथून जाणाऱ्या अनेकांना भेटते...
या वळणावर असलेल्या त्या बाजूच्या पर्वतावरच्या घनदाट जंगलात मी राहते...एकटी!
झाडाच्या फांद्यांचा पसरट झोका करून मी त्यात झोपून जाते. दिवसा भरपूर झोप घेतली की मग रात्री साधारण 9 वाजता मी उठते...
या घाटात या वळणावर काही वर्षांपूर्वी माझा मित्र अभय आणि मी गाडी चालवतांना अंदाज चुकल्याने गाडी दरीत कोसळून ठार झालो... मित्राला मुक्ती मिळाली, पण मला नाही...माझे मन आमच्या आयुष्याला वेगळे वळण देणाऱ्या या वळणाला सोडायला तयार होत नाही.
कारण माझा मित्र आणि मी शेवटचे इथे एकत्र होतो ना, म्हणून! आणि बरं का, तू गाडी चालवत राहा..."
मी भलत्याच प्रसंगात सापडलो होतो. तिला काय म्हणावे हेही समजत नव्हतं आणि आता काय करावं हेही उमजत नव्हतं! मागे वळून बघण्याची हिम्मत होत नव्हती! मी समोर आणि आरशात आळीपाळीने बघत गाडी चालवत राहिलो.
"या वळणावर येणाऱ्या गाड्यांमध्ये जे तरुण मुलं असतात माझ्या मेलेल्या मित्रासारखे, त्यांच्या गाडीसमोर जाऊन मी उभी राहते! उद्देश्य हा की, त्यांना थांबवून माझ्या सौंदर्याने घायाळ करून त्यांना माझ्या मागे मागे नेऊन जंगलातल्या माझ्या राहत्या झाडावर घेऊन जायचं... मग माझा मित्र समजून मी त्यांचेशी रात्रभर मनसोक्त प्रेम करते आणि..." असे म्हणून ती हसायला लागली.
मी गाडी चालवत होतो पण माझ्या लक्षात आता एक गोष्ट यायला लागली. तेच तेच वळण पुन्हा पुन्हा यायला लागलं. म्हणजे मी इतका वेळ गाडी चालवत होतो तरी राहून राहून तिथेच पुन्हा पुन्हा येत होतो. चकवा बसला होता मला!
ती मात्र बोलतच होती.
"आज अमावस्या. कधीतरी अशाच एका अमावस्येला आमचा अपघात झाला होता...आमच्या सारख्यांना अमावस्येला जास्ती ताकद मिळते आणि मला एक बळी तरी लागतोच...मी दर अमावस्येला त्या जंगलातून बाहेर पडून बळी शोधत आसपास जाते. आजही आले होते.."
मी फक्त ऐकत होतो. गाडी चालवत होतो. गाडी पुन्हा पुन्हा त्याच त्याच मार्गावरून पुढे जात होती. तिचे ऐकत राहण्यावाचून पर्याय नव्हता.
"फिरता फिरता तू चहा पितांना दिसलास त्या टपरीवर!"
माझ्या अंगावर शहारे आले. म्हणजे मी चहा पीत होतो तिथे हीसुद्धा होती??
"तू मला आवडलास! आजपर्यंत माझ्या जाळ्यात अडकलेल्या सगळ्यांपेक्षा तू मला जास्त आवडलास. पण तू त्या कोणत्यातरी ट्रक ड्रायव्हरकडे बघत होतास! मी तुला मिळवण्यासाठी बेभान झाले...
मग मी त्या ट्रक ड्रायव्हर मध्ये शिरले आणि त्याच्या मेंदूतल्या नसेवर आतमधून दणका दिला तसा तो बसल्या बसल्या मेला.
मग मी त्याच्या आतमधून त्याचा ट्रक चालवत राहिले जेणेकरून ते बघून तू भारावल्यासारखा ट्रकच्या मागे येशील! आणि ट्रक ड्रायव्हरच्या रूपाने मला एक बळी सुद्धा मिळेल!
तू आलास आणि काही वेळाने मी त्या ड्रायव्हरमधून बाहेर निघाले म्हणून त्याची मान खाली लटकली...! मग तुझ्या गाडीत येऊन बसले!...
मला आवडलेल्या सगळ्या तरुणांना मी माझ्या झाडावरच ठेऊन घेते...त्यांचेशी प्रेम करून त्यांचे तारुण्य शोषून घेते आणि जर्जर, वृद्ध झालेल्या अवस्थेत त्यांना माझ्याजवळ कायमस्वरूपी ठेवते..."
ही बडबड मला असह्य होत होती...
मी आता ठरवलं की मागे वळून बघायचंच! कदाचित मागे कुणी बसलेलं नसेल, फक्त हा आभास असेल, मला फसवायला?
मला आता कुठेतरी याचा अंत करायचा होता....ती खरोखरच असली तरी तिला सांगायचं होतं की, आता गाडीतून उतर खाली! मी गाडी थांबवतो...
काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकू एकदाच!!
बस!
हिंमत करून मी मागे वळून बघितले आणि तिची हिरवी दृष्टी माझ्यावर पडली...
तिच्या चेहऱ्यावर मला आश्चर्यकारक भाव दिसले...
आणि त्याच दरम्यान मला माझ्या शरीरात बदल जाणवू लागले...
पायापासून हळूहळू मांड्यांपर्यंत अचानक कसल्यातरी वेदना होऊ लागल्या, माझ्या पूर्ण शरीरात अचानक बदल व्हायला लागला...
मी होतो त्यापेक्षा कुणीतरी वेगळाच व्हायला लागलो...
माझ्या हाताच्या नखांपासून मनगट आणि खांद्यांपर्यंत काहीतरी सरकत गेलं... माझे केस बदलले...
टेबलावर काचेच्या ग्लास मध्ये अक्रोड ठेऊन तो टेबल हलवला तर अक्रोड जसा हलेल तसा माझा मेंदू डोक्यामध्ये हळू लागला, डोळ्याला प्रचंड मुंग्या येऊन मेंदूमध्ये बदल जाणवायला लागला...
माझे नाक, कान, ओठ बदलत गेले...
शरीराच्या बाहेरच्या आणि शरीराच्या आतमधल्या अवयवात प्रचंड उलथापालथ झाली...
हृदय, आतडे, यकृत, धमन्या, फुफ्फुस हे सगळे अवयव हलू लागले, त्यांच्या जागा बदलल्या, ते शरीरात इकडेतिकडे फिरू लागले, रक्तात अचानक वेगळेपणा जाणवायला लागला... आणि ग जणू काही ते सर्व अवयव बदल होऊन आपापल्या जागी परत येऊन बसले...
"माझा अभय, माझा अभय!"
मला चांगलंच आठवायला लागलं, मी अभय आणि ही आहे प्रणिता..
आम्ही अलकापूरहुन येतांना या घाटात अपघात होऊन आम्ही दोघे दरीत कोसळलो होतो...
हो, मी अभय आहे...
मीच तिचा अभय...
माझा पुनर्जन्म झाला होता..
किशोरच्या रूपाने...
मला सगळं आठवायला लागलं...
मला गाडीच्या मागच्या काचेतून दिसायला लागलं की प्रणिताने झाडावर सांभाळून ठेवलेले जर्जर देह कसेतरी धडपडत पळत आमच्या गाडीमागे धावत येत होते... त्यांचे टोळके आमचा गाडीच्या दिशेने वेगाने येत होते...
मी पुढच्या सीटवरून प्राणिताच्या बाजूला सीटवर उडी घेतली...गाडी आता वेडीवाकडी चालत होती!!
तिच्या डोळ्यात डोळे रोखून पाहिले आणि तिला मिठी मारली...
तिच्याही मुक्तीची वेळ आली होती...
ते टोळके सुद्धा आमच्या गाडीवर मिळेल तिथे बाहेरून लटकलेल्या अवस्थेत गाडीसोबत घसरत येत होते...
आणि गाडीसहित आम्ही सगळे दरीत कोसळलो...
(समाप्त)

Tuesday, 21 August 2018

मी पाहिलेले दशावतारी नाटक!

दशावतारी नाटक ही मालवणी मुलूखातील एक प्रसिद्ध आणि प्राचीन लोककला. भगवान विष्णूंच्या दहा अवतारांतील तसेच इतर पौराणिक व्यक्तिरेखा घेऊन रामायण, महाभारत आणि विविध पुराणे यांतील कथा या नाटकांत रंगमंचावर सादर केल्या जातात. 

मला अलीकडेच म्हणजे 2018 च्या ऑगस्ट महिन्यात 11 तारखेला दशावतारी नाटक बघण्याचा योग आला. तसा मी व्यवसायाने इंजिनियर म्हणून एका खासगी कंपनीत मी कार्यरत आहे पण सर्व प्रकारच्या कलेची तसेच अध्यात्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टींची लहानपापासूनच मला आवड आहे आणि छंद म्हणून मी विविध विषयांवर लिहीत असतो. लिखाणाची मला प्रचंड आवड!

आतापर्यंत माझ्या अनेक लघुकथा, कादंबऱ्या आणि लेख ऑनलाईन प्रसिद्ध झाले आहेत आणि मला त्यावर जगभरातील वाचकांच्या प्रतिक्रिया येत असतात. अशातूनच "कोंकण संवाद" या न्यूज चॅनलचे संपादक श्री. समीर म्हाडेश्वर यांचेशी एकदा फोनवर बोलणे झाले. अतिशय मनमोकळे सद्गृहस्थ. त्यांच्या न्यूज चॅनलच्या वेबसाईट साठी एक लेख लिहिण्याची त्यांनी मला विनंती केली. मग मी त्यांना लेखाचा विषय सुचवायला सांगितले तर मला त्यांनी दशावतारी नाटकाबद्दल लिहा अशी विनंती केली. तसे मी दशावतारी नाटकांबद्दल ऐकून होतो पण कधीही पाहिले नव्हते आणि "गणपतीपुळे" वगळता इतर कोकण न पाहिलेला मी, या लोककलेबद्दल लिहू शकेन का याबद्दल साशंक होतो. 

पण समीर यांनी लवकरच पुण्यात टिळक स्मारक मंदिरात दशावतारी नाटकाच्या एका प्रयोगाला मला आमंत्रित केले. एवढेच नव्हे तर त्यांनी तेथील कलाकारांशी नाटक सुरू होण्याआधी मला बोलता येईल, मेकप रूम मध्ये त्यांना भेटता येईल अशी व्यवस्था सुध्दा त्यांच्या पुण्यातील स्नेही मंडळींतर्फे केली. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच.

रंगमंचामागे: 

ठरल्या वेळेस पोहोचलो तेव्हा मेकप रूम मध्ये मी कलाकारांची लगबग पहिली. नाटक सुरू होण्याच्या जवळपास दोन तास आधीपासून ही कलाकार मंडळी आणि संचालक तसेच संगीत विभाग सांभाळणारी मंडळी यांची लगबग सुरू झाली होती. मी जमेल तसे कलाकारांना त्यांच्या मेकप (वेशभूषा आणि केशभूषा) मध्ये जास्त व्यत्यय न आणता विविध प्रश्न विचारायला सुरुवात केली. सर्वांनीच माझी आस्थेने चौकशी करून माझ्या प्रश्नांची छान उत्तरे दिली. 

संगीत हा या नाटकाचा आत्मा असतो. हार्मोनियम, पखवाज, झांज यासारख्या वाद्यांच्या साहाय्याने नाटकातील दृश्यांना पार्श्वसंगीत दिले जाते तसेच अधून मधून नाटकातील प्रसंगांवर गाणे सुध्दा सादर केले जाते असे मला या सगळ्यांची मुलाखत घेतांना समजले. ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी किती ही त्यांची मनापासून मेहनत चालली होती! ते पाहून थक्क व्हायला होत होतं!

हे मंडळ खानोलकर दशावतारी नाट्य मंडळ होते. तसेच मुंबई हितवर्धक दशावतार नाट्य मंडळाचे उपसचिव यांनी मला अनेक प्रकारची मोलाची माहिती दिली. तसेच सर्व कलाकारांची ओळख करून दिली.

तेथील सर्व कलाकार स्वतःचा मेकप स्वतःच करत होते. स्त्रियांची भूमिका पण यात पुरुष कलाकारच करतात हे त्यातील एकाने मला सांगितले. पण त्यांचा मेकप इतका हुबेहूब होता की तो पुरुष आहे हे माहिती असूनही साडी बदलणाऱ्या एका कलाकराकडे जेव्हा मी मुलाखत घेण्यासाठी जायला कचरलो तेव्हा तो कलाकार हसायला लागला आणि म्हणाला, "हीच तर या लोककलेची खासियत आहे सर! पण एक खंत वाटते की या कलेची म्हणावी तेवढी दखल प्रेक्षक आणि सरकारकडून घेतली जात नाही. आम्हाला मिळणारे मानधन हे इतर नाटकांच्या कलाकारांच्या तुलनेत तुटपुंजे असते."

नाटकातील यक्षाची भूमिका करणारे एक कलाकार त्यांचा मेकप पूर्ण करून माझेकडे आले. मी त्यांचेसोबत सेल्फी घेतली, नंतर दिलखुलासपणे ते म्हणाले, "खरे तर कर्नाटकातील "यक्षगान" आणि आपली दशावतार कला एकमेकांच्या जुळ्या बहिणीच. मी आणि आणखी एक कलाकार अशा आम्हाला दोघांना खलनायकी म्हणजे यक्ष, राक्षस अशा भूमिका करण्याची सवय झाली आहे. तसेच आम्ही बदल म्हणून विनोदी भूमिका सुध्दा करतो!"

त्यांचा यक्ष हा इतका हुबेहूब होता की यांनी तेथे जर का "राक्षसी गडगडाटी हास्य" माझ्यासमोर सुरू केले असते तर मुलाखत घ्यायची सोडून मी नक्की  मेकप रूम मधून बाहेर पळालो असतो...

नंतर नारद मुनी, भगवान शंकर, राजा, कोळी यांचे दर्शन झाले. हे पाहून मला जुन्या काळात गेल्यासारखे वाटायला लागले होते. मग मी काही सेल्फी आणि काही फोटो पटापट माझ्या कॅमेरात बंदिस्त केले. 

एकूण मूळचे दशावतारी पारंपारिक मंडळ फक्त नऊ आहेत, पण सध्या अनेक मंडळ कार्यरत असतात. नाटकात नेहमी शेवटी एक चांगला संदेश असतो तसेच नाटके बहुतेक वेळा सुखांत असतात म्हणजे हॅपी एन्डींग! तसेच या लेखाच्या शेवटी मी एक खास माहिती सांगेन. मुद्दाम शेवटी! तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का मिळावा यासाठी!

सगळ्यांची तयारी (मनाची सुध्दा) झाल्यानंतर गणेश वंदना झाली आणि कलाकार रंगमंचावर जायला तयार झाले. मग मी तेथील संचालक यांनी सांगितल्याप्रमाणे प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेत जाऊन बसलो.

प्रत्यक्ष रंगमंचावर:

(मागे काळा पडदा. नेपथ्य नाही. संगीतकारांनी आपापली जागा घेतलेली आणि गाणे सुरू झालेले. प्रेक्षागृह खचाखच भरलेले होते)

"सूर निरागस हो" या गाण्याने सुरुवात होते. नंतर आलेलं "एक राधा एक मिरा, एक प्रेम दिवानी, एक दर्द दिवानी" हे गाणे अचानक जुन्या आठवणी जाग्या करून गेलं. कॉलेज जीवनात ऐकलेलं हे गाणं बऱ्याच कालावधीनंतर अनपेक्षीतपणे ऐकायला मिळालं होतं.

मग रंगमंचावर शंकर येतात. नारद शंकर संवाद सुरू होतो. शंकर गेल्यानंतर नारद गातात: "भक्तिविना मुक्ती नाही!"

नंतर नारद भजन म्हणतात मग यक्षाची एन्ट्री (आगमन).

नारद यक्षाला एक चुकीचा सल्ला देतात कौंडीण्यपूरच्या राजाला मारण्याचा आणि त्याचे राज्य काबीज करण्याचा.

मग कौंडीण्यपूरच्या राजाचे भाषण, युवराज शिक्षण घेऊन परत आलेले असतात. दोघांचा संवाद. युवराज जातो.

राजासमोर राक्षस येतो. राक्षस राजा युद्ध होते. युद्ध होतांना गाणे. 

(राजा आणि यक्ष तलवार घेऊन नाचतात आणि गाणे होते)

राजा जखमी. मंत्री येतो आणि यक्ष पळून जातो. मंत्री राजाला घेऊन जातो.

प्रसंग बदल:

कोळी (मासेमार) येऊन विनोद निर्मिती करतो.

(हे विनोद मालवणी भाषेत असल्याने मला कळले नाहीत पण प्रेक्षकांत हास्याचे कारंजे उडत होते, टाळ्या पडत होत्या)

कोळ्यांची मुलगी मासे विकते. तिच्यावर यक्षाची वाईट नजर आणि हल्ला. एक तरुण तिला वाचवतो. तरुण यक्ष संवाद आणि युद्ध. यक्ष पळून जातो.

"या जन्मावर शतदा प्रेम करावे" हे गाणे वाजवले जाते.

तो तरुण आणि ती कोळीण यांची मैत्री. प्रेम.

तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून युवराज असतो. 

राजाकडे कोळी आणि त्याची मुलगी लग्नाच्या विनंतीसाठी जातात.

राजाचा दोघांच्या लग्नाला विरोध. "राजघराणे आणि धीवरकन्या यांचे मिलन होऊ शकत नाही", असे म्हणतो.

पण नारदाची मध्यस्थी. 

राजा शांतनू आणि धीवर कन्या सत्यवती यांचे महाभारतातील उदाहरण नारद देतो आणि लग्न लावून देतो.

नंतरही अनेक प्रसंग येतात. नाटक संपते. टाळ्या पडतात....

हे नाटक अडीच तास चालले. कोकणात मात्र रात्रभर हे नाटक चालते. तेथे गावाकडे हे नाटक मंदिरांत रात्री सुरू होते आणि सकाळी संपते. हो अनुभव अर्थातच काही वेगळाच असेल यात वादच नाही.

नाटक सुरू असतानाच काही प्रेक्षकांकडून संगीतकारांना किंवा कलाकारांना बक्षीस जाहीर होत होते. मग नाटक मध्येच थांबवून बक्षीस देणाऱ्याचे नाव वाचले जायचे. मी सुध्दा रंगमंचावर जाऊन नारद मुनींना त्यांच्या भूमिकेसाठी बक्षीस देऊन आलो. कलेची दाद म्हणून!

नाटक संपल्यावर बाहेर आलो तेव्हा बाहेर पाऊस सुरू होता. टिळक रोडवर ट्रॅफिक, रात्रीचे एल्ईडी दिवे, जाहिराती, दुकाने असे आधुनिक जग दिसायला लागले. एक वेगळी आठवण मनात घेऊन मी घरी आलो...

आता राहिला कबूल केल्याप्रमाणे आश्चर्याचा सुखद धक्का देतो तो म्हणजे दशावतारी नाटकाला चक्क संहिता नसते. म्हणजे कथा, पटकथा, संवाद वगैरे काहीच आधी ठरलेले नसते. उत्स्फूर्तपणे हे कलाकार सगळे नाटक सादर करत असतात. आहे की नाही गंमत!!

- निमिष सोनार, पुणे.

Friday, 20 July 2018

मी लिहितो तरी कधी?

मला सगळेजण विचारतात, "एवढ्या मोठ मोठ्या कादंबऱ्या कधी लिहितोस तू? ते सुध्दा पर्सनल आणि प्रोफेशनल जबाबदाऱ्या सांभाळून?"

अर्थात हे सगळं आस्थेने ते विचारतात. माझी काळजी म्हणून!

मग मी त्यांना फक्त एका म्हणी द्वारे उत्तर देतो,
"थेंबे थेंबे तळे साचे!"

रोज थोडे थोडे लिहिले की त्याची काही वर्षांनी होते कादंबरी! कारण मला सलग असा वेळ मिळत नाही.

बरेचदा वेळ न मिळाल्याने लिहिण्यात खूप गॅप पडला की माझ्याच कादंबरीतल्या पात्रांची नावं आठवत नाहीत मग मीच लिहिलेले पुन्हा मीच वाचून काढतो, एखाद्या तटस्थ वाचका सारखा! आणि मग त्यात थोडा बदल करावासा वाटतो.

बरेचदा गॅप गेल्याने फायदा सुध्दा होतो...

एखादा प्रसंग मी काही दिवसांपूर्वी जसा लिहिला असता त्यापेक्षा गॅप गेल्यानंतर तो प्रसंग मी वेगळ्या पद्धतीने लिहिण्याची प्रेरणा मिळते कारण गॅप मध्ये मला त्या प्रसंगाबद्दल वेगळा दृष्टिकोन मिळतो...
कदाचित कादंबरीला एक वेगळं वळण सुध्दा मिळतं आणि तेच कादंबरीच्या फायद्याचं ठरतं...

आणि हे नंतर लक्षात येतं.

कधी कधी इतकं पटापट सुचतं की झरझर आणि भरभर लिहून मोकळे झाल्याशिवाय चैन मिळत नाही..

आणि कमी वेळेत खूप जास्त आणि खूप चांगलं लिहिल्या जातं..
अर्थात हे सगळं माझ्याकडून कोण करवून घेतं?
मला लिहिण्याची प्रतिभा आणि प्रेरणा देणारा तो भगवंत.
अधिक चांगली कलाकृती निर्माण व्हावी म्हणून कदाचित!!
(15-Jun-2018)

- निमिष सोनार
#nimishtics

मीठ, मिठा आणि मराठी


मला काल संध्याकाळी कोळशावर कणीस भाजणारा एक जण दिसला. गाडीवाला. पावसाळयात नेहमी दिसतात तसाच एक!
मी: "एक कणीस भाजून दे!"
मला सर्दी आणि खोकला झाला असल्याने पुढे म्हणालो, "फक्त मीठ लावा, लिंबू तिखट नको!"
पण त्याचे जवळ एका भांड्यात तिखट मीठ एकत्र केलेले होते आणि एकच लिंबाची फोड त्यात अगदी मनसोक्त बुडालेली दिसत होती. बहुदा त्याचेजवळ तो एकच लिंबू असावा जो तिखट मिठात पुन्हा पुन्हा बुडवून प्रत्येक ग्राहकाच्या कणीसाला चोपडत असावा, असो पण येथे तो विषय नाही...
"फक्त मीठ लावा" असे म्हटल्यावर तो कणीस वाला निर्विकार पणे म्हणाला, "हां साब, सब मिठा ही हैं!"
(त्याला म्हणायचे होते की सगळी कणीस गोडच आहेत!)
मी म्हणालो, "मराठी मे नमक को मीठ बोलते है, मैं बोला सिर्फ नमक लगाना! निंबु मिरची नहीं! मराठी नहीं समजता क्या?"
तो, "सिरफ नमक नहीं हैं! सब मिक्स हैं!"
मी: "राहू द्या, नुसतं कणीस भाजून द्या, त्याला काहीच लावू नका!"
कणीस: "मतलब?"
मी: "उपर कुछ मत लगाना. वैसे ही देना!"
पुण्यात असूनही मी "मराठी बोलणारा एलियन" असल्याची जाणीव पुन्हा एकदा मला झाली. मराठी बोलणारे लोक महाराष्ट्रा च्या सांस्कृतिक राजधानी पुण्यात एलीयन सारखे झालेत असे वाटण्यासारखी अनेक उदाहरणे मला अस्वस्थ करतात.
मग पुन्हा तोच प्रश्न मला सतावून गेला:
वर्षानुवर्षे पुण्यात व्यवसाय करूनही मराठी विना हे लोक कसे तरून जातात? त्यांना मराठी बोलण्याची गरज का वाटत नाही?
पुन्हा तेच उत्तर डोक्यावर दणका देऊन गेलं:
मराठी माणसं स्वतःच बाहेर कुठेही संभाषणाची सुरुवात हिंदीतून करतात आणि मराठी बोलायचा कंटाळा करतात किंवा कमीपणा समजतात म्हणून समोरच्याला सुध्दा वाटतं की मराठी विना पुण्यात रहाणे सहज शक्य आहे.
चूक आपली आहे, त्यांची नाही!
आपणच जर मराठीचा आग्रह धरला तर त्यांच्या व्यवसायासाठी ते मराठी शिकतीलच!!
मराठी माणसच जर का पुण्यात मराठी बोलणार नसतील तर मग दुसरं कोण बोलणार? आपण बोलल्याशिवाय दुसरे इतर राज्यांतील लोक तरी कशाला आणि का म्हणून मराठी बोलतील?
उदाहरण घ्यायचे तर हे घेता येईल:
भाजीवाला मराठीत ओरडत असतो, "भाजी घ्या, टमाटे वांगे! लसूण, आलं घ्या!" आणि मराठी माणूस त्याला विचारतो, "भैय्या अद्रक कितने का दिया?"
काय म्हणावं याला आता?
मराठीत ताईची दीदी झालीया
आणि आल्याचं अद्रक झालंया
मराठीचं तुफान आता संपलंया
त्याचं वारं बी वाहनं बंद झालंया

Written on: 8-July-2018

पुण्यातील राजेशाही दुचाकीस्वार

पुण्यातील काही राजेशाही दुचाकीस्वार स्वतःला हत्तीवर बसून प्रजेला संबोधन करण्यासाठी निघालेले राजे किंवा युद्धासाठी घोड्यावर निघालेले सैनिक समजतात ज्यांना असे वाटत राहते की रस्ता फक्त आपल्यासाठी आहे. जणू काही रस्त्यावर इतर वाहने किंवा पायी चालणारे लोकं अस्तित्वात नाहीत. आला समोर त्याला तुडवा पायाखाली! किंवा त्यांना वाटते आपण एखादे स्पेस शिप चालवत आहोत आणि आकाशात कुणीच आजूबाजूला नाहीत. प्रकाशाच्या वेगाने झुईंग करत त्यांना आकाशगंगेच्या दुसऱ्या टोकाला एखादा वैज्ञानिक शोध लावायला जायचे असते म्हणून ते एवढे घाई करतात.
छोट्या गल्लीतून मुख्य रस्त्यावर निघतांना हॉर्न वाजवणे हा ते स्वतःचा अपमान समजतात. मुख्य रस्त्यावरचा कुणी इतर वाहनचालक अचानक हॉर्न न देता गल्लीतून आलेल्या अशा राजेशाही दुचाकीस्वारामुळे गडबडून पडला किंवा कुठे धडकला तरीही स्वतःची चूक ते मान्य न करता आणखी त्या धडपडलेल्या माणसावर खुन्नस खातात आणि बेपर्वाईने निघून जातात.
असे हे दुचाकी स्वार पुढील वाहनाच्या डावीकडून ओव्हर टेक करून (उजवीकडून भरपूर मोकळी जागा असून सुध्दा) त्याला घाबरवून सोडण्यात वाकबगार असतात.
इंडिकेटर न देता अचानक कोणत्याही बाजूला ते वळतात आणि मागच्या बाईकवर बसलेले आपण त्यांचेकडे रागाने पाहिले तर तेच आपल्याकडे रागाने बघतात जशी काही आपलीच चूक आहे की आपण त्यांच्या मनातले ओळखले नाही की यांना कुठे वळायचे आहे ते!
छोट्या छोट्या गल्लीतून जेथे दाट लोकवस्ती आहे तेथून हे मुद्दाम अतिशय वेगाने जातात. लहान मुले वगैरे खेळत आहेत की नाहीत हे बघत नाहीत. रस्ता हा काही खेळायचे मैदान नसले तरी दाट लोकवस्तीत जेथे घरांना लागूनच रस्ता आहे तेथे बाईक चालवतांना थोडी सावधगिरी बाळगायलाच हवी!
पायी चालणाऱ्या मंडळींना जणू जगण्याचा हक्कच नाही अशा आविर्भावात ते अत्यंत वेगाने गाडी चालवत धडक देऊन पसार होतात. अशा अनेक घटना आपण रोज पेपरात वाचतो.
असे राजेशाही दुचाकीस्वार सिग्नलला बरोबर झेब्रा क्रॉसिंग वरच आणून गाडी उभे करतात.
पायी चालणाऱ्या लोकांना तर हे रस्ता पार करूच देत नाहीत. झेब्रा क्रोसिंग असले तरी वेग कमी करत नाहीत. पादचाऱ्याना तर जीव मुठीत घेऊन रस्ता क्रॉस करावा लागतो!
इतरांना पण हॉर्न वाजवून वाजवून सिग्नल लाल असताना तो तोडायला भाग पाडतात.
आणि आजकाल काही बाईक तर इतक्या विचित्र जडणघडणीच्या आणि आकाराच्या असतात की त्यावर बसणारा असा काही विचित्र पद्धतीने बसलेला असतो की वाटते की हा माणूस आहे की कुणी टर्मिनेटर आला आहे हेलमेट घालून! काही बाईक चे आवाज इतके कर्ण कर्कश्य असतात की त्यापेक्षा जेट फायटर विमानांचा आवाज परवडला!
अशा बाईक स्वारांची महती जेवढी वर्णावी तेवढी कमीच आहे. गरज नाही तेथे हॉर्न वाजवणे आणि जिथे गरज आहे तिथे हॉर्न न वाजवणे हे अशा बाईक स्वारांचे मुख्य लक्षण आणि वैशिष्ट्य असते.
अशा काही मस्तीखोर आणि मिजासखोर पुणेरी बाईक वाल्यांना समज कोण देणार किंवा त्यांना समज कधी येणार?
तेव्हा, सावधान, बाजूला व्हा आणि पळा! पुणेरी दुचाकी वाले स्वयंघोषित राजे येत आहेत!!

Written on: 8-July-2018

संत चरित्रे आणि वारी

सध्या सुरू असलेल्या वारी च्या पवित्र वातावरणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सगळ्या संतांची चरित्रे आणि शिकवण वाचण्याची आणि संबंधित चित्रपट बघण्याची सुरुवात मी जसा वेळ मिळेल तशी केली आहे. (संत एकनाथ, तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, रामदास वगैरे).
या सर्व संतांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे रामायण , महाभारत, भगवद्गीता आणि श्रीमद्भागवत यांचा त्यांनी केलेला अभ्यास आणि त्याप्रमाणे त्यांनी केलेले आचरण आणि त्या आधारे इतरांना त्यांनी दिलेली शिकवण. त्यांची कृष्ण (विठ्ठल) भक्ती आणि कीर्तन आणि त्यांनी सांगितलेला नामस्मरणाचा महिमा!
त्यामुळे गीता आणि भागवतपुराण या दोन गोष्टींचा आपल्या रोजच्या वाचनात मी आधीच समावेश केलेला आहे. जसे रोजच्या आहारात आपण काही हेल्दी गोष्टींचा समावेश करतो त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या वाचनात गीतेचा आणि श्रीमद्भागवतचा समावेश असायला हवा, असे माझे वैयक्तिक मत आहे.
अन्नदान आणि ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. त्यानुसार या वारीला मी एका दिंडीला अन्नदानासाठी मदत केली आहेच! राहिला प्रश्न ज्ञानदानाचा!
तर मी वेळोवेळी गीतेवर लिहिलेल्या लेखांमधून एखाद्या वाचकाला जरी गीता आणि भागवत वाचण्याची प्रेरणा मिळाली तरी ज्ञानदानाचा माझा अल्पसा प्रयत्न सफल होणार हे नक्की! तसेच मी माझ्या अनेक स्नेह्यांना नेहमी "भगवदगीता" भेट देतच असतो! जगातील सर्वोच्च ज्ञान भगवद्गीतेची एक ज्योत आपण नीट पेटवली की ती ज्ञानज्योत इतर ज्योतींना पेटवत रहाते आणि त्याद्वारे स्वत:सुद्धा अविरतपणे जळत राहते!
"ज्ञानदीप लावू जगी!"
आणि कोणतेही दान हे काहीतरी भविष्यात आपल्याला काही लाभ होईल या हेतूने नाही तर दान घेणाऱ्याला त्याचा योग्य लाभ झाला पाहिजे हा हेतू असला पाहिजे.
|| जय जय, राम कृष्ण हरी ||
|| विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल ||
|| हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ||
|| हरे राम हरे राम, राम राम हरे हरे ||

Written on 8-July-2018